Ashadhi Ekadashi : पंढरीच्या विठुरायाची स्वयंभू मूर्ती; प्राचीन-पौराणिक खुणांचा ऐतिहासिक ठेवा!

सोलापूर : तीर्थक्षेत्र पंढरपुरातील श्री विठुरायाची मूर्ती स्वयंभू आहे. श्री विठुरायाला श्री विष्णूचा अवतार देखील मानला जातो. या मूर्तीवर काही प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक अशा खुणा आहेत. श्री विठुरायाच्या महापूजेप्रसंगी देवाचे केशरयुक्त कोमट पाण्याने स्नान झाल्यानंतर कोमल आणि मऊसूत अशा पंचाने मूर्ती कोरडी केली जाते. त्यानंतर देवाच्या कपाळी चंदनाचा एक छोटासा टिळा लावला जातो. तसेच देवाच्या मुकुटावर श्री शंभू महादेवाच्या पिंडीला लावतात, तसा अर्ध गोलाकार चंदनाचा गंध लावला जातो.
त्यानंतर देवाचे पुजारी हातामध्ये चांदीचे मोठे निरंजन घेऊन देवाच्या अंगावरील या प्राचिन आणि पौराणिक खुणा भाविकांना मोठ्या आवाजात सांगतात. प्रत्येक खुणेचा उल्लेख करताना चांदीचा दीप त्या-त्या खुणेजवळ नेऊन तो अधिक चांगल्या पद्धतीने भक्तांना दिसेल असेही यावेळी पाहिले जाते.
मूर्तीच्या संवर्धनार्थ आलेल्या सरकारी निर्बंधामुळे अलीकडे श्री विठुरायाच्या महापूजेचे प्रमाण कमी झाले आहे. श्री विठ्ठलाला सावळ्या, काळ्या असे संतांनी संबोधले असले तरी देवाची मूर्ती ही करड्या रंगाची असल्याची भासते. मूर्ती वालुकामय दगडाची खडबडीत अशी आहे. मूर्तीची उंची सुमारे तीन फूट नऊ इंच असावी.
श्री विठुरायाच्या मस्तकावरील मुकुट हा पारशी लोकांच्या टोपीसारखा दिसतो. यालाच शिवलिंग, असेही संबोधले जाते. देवाच्या मस्तकी म्हणजे एकदम वरील बाजूस शिवपिंड आहे. श्री विठुरायाच्या गळ्यात कौस्तुभ मण्यांचा कोरलेला कंठा आहे. तो छातीवर भारदस्तपणे दिसून येतो.
भ्रूगू ऋषींनी केलेल्या प्रहाराचे म्हणजेच भ्रूगूलांच्छनाची श्री विठुरायाच्या छातीवर खून दिसून येते. श्री विठुरायाच्या कमरेला करदोडा आहे. यालाच ” तीनपदरी मेखला “असेही म्हणतात. श्री विठुराय दोन्ही पाय जुळवून उभे असलेली वीट ही भक्तराज पुंडलिकाने दिलेली आहे. ही वीट एक चौरस फूट आकाराची आहे.





