Eknath Shinde : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सपत्नीक पूजा

Eknath Shinde : आज आषाढी एकादशीचा सण असल्याने राज्यभरातून भाविक पंढरापूरात विठलाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. भाविकांच्या भक्तिसागरात पंढरी न्हाऊन गेली आहे. याशिवाय राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भक्तांची रीघ लावलेली पाहायला मिळत आहे. पंढरीसह राज्यातील इतर विठ्ठल मंदिरे देखील सजली आहेत. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर वडाळा येथील प्राचीन विठ्ठल रखमाई मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा करून दर्शन घेतले.
वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर हे १६ व्या शतकातील असून प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराज यांच्या हस्ते या देवळात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते इथे येऊन विठुरायाचे दर्शन घेतात असे सांगितले जाते. याठिकाणी विठुरायाची पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.
राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी, कष्टकरी, कामगार, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांच्या आयुष्यातील दुःख, कष्ट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावे, अशी प्रार्थाना त्यांनी केली. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी देखील पूजेत सहभागी होत दर्शन घेतले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, माजी नगरसेवक अमेय घोले तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तगण उपस्थित होते.
पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. या पूजेला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक पूजा करून विठ्ठल आणि रुक्मणी मातेचे दर्शन घेतले. या पूजेत वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिकच्या जातापूर तालुक्यातील उगले कुटुंबाला पूजेचा मान मिळाला.
हेही वाचा : ‘भारताची गुन्हेगारीची राजधानी’, गोपाळ खेमका हत्या प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया





