Jamkhed : ११ वर्षांपासून गफ्फार पठाण यांचा सामाजिक सलोखा जपणारा प्रेरणादायी उपक्रम; भाविकांसाठी मोफत प्रवास सेवा

जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण हे मुस्लिम समाजातील असूनही आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिंदू भाविकांसाठी गेली ११ वर्षे मोफत प्रवास सेवा देत आहेत. जात-पंत-धर्म या सर्व भिंती पार करत “माणूसपणाच्या भावनेतून” ते हे कार्य करत असून, त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सौहार्दाचे जिवंत उदाहरण निर्माण झाले आहे.
यंदाही पंढरपूर वारीसाठी पाटोदा, भवरवाडी, खामगाव, धरणगाव, पारेवाडी, डोणगाव, मैदान मातकुळी या परिसरातील असंख्य भाविक भक्तांना पिकअप वाहनांद्वारे मोफत प्रवास सेवा पुरवण्यात आली आहे. भाविकांसाठी चहा ,नाष्टा व जेवणाची उत्तम सोयही करण्यात आली आहे.
आज सकाळी ९ वाजता पाटोदा बसस्थानकापासून भगवी पताका हाती घेऊन गफ्फारभाई पठाण यांनी स्वतः पायी वारीला सुरुवात केली. “विठू नामाचा गजर” करत गाव दुमदुमले आणि श्रीफळ वाढवून या भक्तिप्रवासाची सुरुवात झाली.
यावेळी माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्यासह कल्याण कवादे पाटील, आप्पा कडू, बाळासाहेब राऊत, प्रकाश कार्के, केदार वाबळे, नवनाथ महानवर, जगन्नाथ यादव, हनुमंत वारे, अशोक पारे, संजय नन्नवरे, राजेंद्र समुद्र, बापू बडे, महादेव महारनवर, रामदास पारवे, सागर राऊत, बापूराव पारे, नवनाथ चव्हाण तसेच माता-भगिनींमध्ये पल्लवी पारे, सुंदर परी, जनाबाई राऊत, रतन पारवे आदींची उपस्थिती होती.
गफ्फारभाई पठाण यांचे हे कार्य केवळ सामाजिक नव्हे, तर धार्मिक सहअस्तित्वाचे प्रतीक ठरले आहे. मुस्लिम समाजातील व्यक्ती हिंदू धर्मातील वारीच्या आयोजनात पुढाकार घेत असल्याने त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी बनले आहे.





