नवी दिल्ली – आषाढी एकादशीनिमित्त राजधानीत आयोजित सांकेतिक वारीत दिल्लीकर मराठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे राजधानीत पंढरी अवतरल्याचे विठ्ठल भक्तांना जाणवत होते. दिल्लीतील रस्ते विठुरायाच्या नामस्मरणात भक्तीरसात दंग होवून, भर पावसात ‘भेटीलागीं जीवा लागलीसे आस’चे पुन्हा एकदा साक्षीदार ठरले. पारंपारिक वेशभूषा, फुगड्या घालत विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन होऊन ही वारी आर.के.पुरम सेक्टर-६ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दिशेने निघाली. पहाटे सहा वाजता बाबा खडकसिंह मार्गावरील हनुमान मंदिर येथून ही वारी सुरू झाली. भगवे झेंडे हाती घेवून,डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, कपाळी टिळा लावलेल्या असंख्य भाविकांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. ‘जय जय रामकृष्ण हरी’ नामाचा गजर करण्यात आला. यावेळी आर के पुरम येथील विठ्ठल मंदिरात महापूजा संपन्न झाली. भक्तीच्या महारसात, १५ किलोमीटरची वारी करीत वैष्णवांचा हा मेळा दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. स्वच्छतेची विशेष काळजी घेत रस्त्यावर कचरा होणार नाही, याची दक्षता मराठी बांधवांनी घेतली होती, हे विशेष. राम मनोहर लोहिया सर्कल येथे या वारी खासदार धैर्यशील पाटील, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, केंद्र शासनाच्या विविध विभागात असणारे मराठी अधिकारी या वारीत सहभागी झालेत. महाराष्ट्र संस्कृतीच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारी परंपरेत मागील 5 वर्षांपासून दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी होतात. साधारण ८ ते ९ दिवसात आळंदी ते पंढरपूरपर्यंतची मार्गक्रमण पूर्ण करून विठ्ठलाचा आशीर्वाद समस्त दिल्लीकर बांधवांसाठी घेऊन येतात.याही वर्षी हे वारकरी विठ्ठल दर्शन घेऊन दिल्लीतील या सांकेतिक वारीत सर्वांसमवेत सहभागी झाले होते, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दिली.