Pune District : माऊलींच्या रथाचे प्रस्थान होताच जेजुरीनगरी सुनी
Pune District : बर्जर पेंटस इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने १० हजार वैष्णवांना बॅग्ज -टूथब्रश पेस्ट, साबण, तेल, आदी स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.

जेजुरी : गेल्या तीन दिवसांपासून वैष्णवांच्या आगमनाने गजबजलेली राम कृष्ण हरीच्या गजराने दुमदुमलेली खंडेरायाची मल्हारनगरी अर्थात जेजुरी माऊलींच्या रथाने मंगळवारी (दि.१४) सकाळी वाल्ह्यातील वाल्मिक ऋषींच्या नगरीकडे प्रस्थान ठेवले. दुपारपर्यंत सर्व वैष्णवांच्या दिंड्यांचा मेळा नगरी बाहेर पडला. अवघे शहर सुने सुने झाले. अवघ्या शहरवासीयांना काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते.
रविवारी व सोमवारी (दि. १३) रोजी जेजुरी नगरीत वैष्णवांच्या विविध दिंड्यांचा मुक्काम होता. वारीच्या निमित्ताने राज्याच्या विविध प्रांतातून आलेले वैष्णव बांधव माता भगिनी वर्षातून एकदाच कुलदैवत खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होत जेजुरीकरांचा पाहुणचार घेतात. भोजनाचा आनंद घेतल्यानंतर मग रात्री भजन कीर्तन प्रवचनात दंग होतात. रथाचा मुक्काम संपल्यावर एकमेकांची गळा भेट घेताना सर्वांचा कंठ दाटून आला. सकाळी जेजुरी नगरीतून माऊलींच्या पालखी रथाने वाल्हे गावाकडे प्रस्थान ठेवले. सकाळी वाल्हे मार्गावरील दौडज खिंड येथे सोहळा न्याहारीसाठी विसावला. कोळविहिरे, भोरवाडी, तरसदरा आदी वाड्या- वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या वतीने तयार करून आणलेल्या भाजी भाकरीचा आस्वाद वैष्णवांनी घेतला.
बर्जर पेंटस इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने १० हजार वैष्णवांना बॅग्ज -टूथब्रश पेस्ट, साबण, तेल, आदी स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. कंपनीचे सरव्यवस्थापक कुणाल सलाट, व्यवस्थापक दुर्गप्रसाद दाते, श्रीकांत अरवतू, नारायण शिनलकर आदींनी उपक्रमाचे आयोजन केले होते. सातारा जिल्ह्यातील फलटण, वेळापूर येथेही कंपनीच्या वतीने वैष्णवांना सुविधा देण्यात येणार असल्याचे श्रीकांत अरवतू यांनी सांगितले.





