अरविंद केजरीवालांच्या सुटकेमुळे कोणाचा फायदा कोणाचा तोटा? कॉंग्रेसवर काय परिणाम होणार, वाचा…

Arvind Kejriwal Bail – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली असून ते जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फायदा होणार आहे. त्याचे कारण केजरीवाल म्हणजे आप आणि आप म्हणजेच केजरीवाल हे समीकरण मतदारांच्या डोक्यात घट्ट आहे. शिवाय भारतीय जनता पार्टीच्या आक्रमक प्रचाराला त्याच आक्रमकतेने उत्तर देणारे केजरीवालच आज देशात निर्विवादपणे एकमेव नेते आहेत हेही नाकारता येत नाही.
अन्य नेते विशेषत: कॉंग्रेसचे नेते केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आक्रमक आहेत, मात्र केजरीवाल भाजपला ज्या प्रकारे बॅकफूटवर रेटू शकतात ती किमया अन्य पक्षांच्या नेत्यांना जमली नाही. केजरीवाल यांच्या सुटकेचा भाजपलाही या सुटकेचा फायदा होणार आहे असा चकित करणारा तर्कही मांडला जातो आहे. त्यामागची कारणेही देण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांची सुटका झाल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. संजय सिंह मोठे नेते आहेत, मात्र केजरीवाल यांची लोकप्रियता त्यांच्यापेक्षा कैक पटीने अधिक आहे. केजरीवालांच्या सुटकेने आपमध्ये चैतन्याची लाट पसरली आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रचारातील अनुपस्थितीमुळे दिल्लीतील प्रचार एकतर्फी होत चालल्याचे भासत होते.
तशी स्थिती आता राहणार नाही. कॉंग्रेस आणि आप दिल्लीत एकत्र आले असले तरी प्रचारात अद्याप म्हणावी तशी ती एकरूपता उमटलेली नाही. आता केजरीवाल सकाळपासून रात्री प्रचार संपेपर्यंत कार्यकर्त्यांना आणि प्रसारमाध्यमांनाही खाद्य देत राहणार असल्याने दिल्लीतील रंगत वाढत जाणार आहे.
केजरीवाल तुरूंगात होते तेंव्हा स्वाभाविक आपच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. अनेक सर्वेक्षणात ही बाब समोर येऊ लागली होती. अटकेच्या कारवाईमागे राजकारण असू शकते, तथापि, न्यायालये जामीन अर्ज फेटाळत असल्याचे दिसत असल्यामुळे काहीतरी काळेबेरे नक्कीच असणार असे मानणारा एक मोठा वर्गही दिल्लीत असू शकतो.
तरीही आम आदमी पार्टीने अटकेच्या मुद्द्यावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न जोमाने सुरू केला होता. केजरीवालांचे फोटो आणि त्यानुरूप घोषणाबाजीही दिली जात होती. त्या पक्षाने सेट केलेले हे नॅरेटीव्ह तोडणे भाजपला अडचणीचे ठरत होते. सर्वेक्षणातही सहानुभूतीचा मुद्दा वरचढ ठरताना दिसत होता. आता केजरीवाल प्रचारात समोर असल्यामुळे सहानुभूतीचा विषय मागे पडून केजरीवालांना थेट लक्ष्य करता येणे भाजपला अधिक सोपे ठरणार आहे.
शिवाय ऐन निवडणुकीच्या काळात केजरीवालांना तुरूंगात टाकल्याच्या आरोपांतूनही भाजपला दिलासा मिळेल. असेही न्यायालयाने क्लीन चिट देणे आणि जामीनावर सुटका करणे यातही मोठा फरक असतो. जामीन देताना सुप्रीम कोर्टानेही केजरीवाल यांना १ जून रोजी सरेंडर करायचे आदेश दिले आहेत.
तो मुद्दा भ्रष्टाचाराच्या पीचवर बॅटींग करायची ठरली तर भाजपला ॲडव्हान्टेज देणारा असेल. कारण भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनातूनच केजरीवाल यांच्या पक्षाचा जन्म झाला आहे आणि केजरीवाल त्याच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीनावर आहेत हे नवे नॅरेटीव्ह भाजपने अगोदरच सेट केले आहे.
कॉंग्रेसवर होणार परिणाम –
देशात नरेंद्र मोदी विरूध्द केजरीवाल अशीच लढत असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीकडून गेल्या निवडणुकीपासून सुरू आहे. आता केजरीवाल बाहेर असल्यामुळे माध्यमांचा झोत त्यांच्यावर अधिक राहणार आहे. दिल्लीत तर केजरीवाल- मोदी असाच सामना दाखवला जाईल. त्यात कॉंग्रेस पक्ष अर्थातच मागे पडेल.
इंडिया आघाडीत कॉंग्रेसने आपले स्थान भक्कम केले आहे. जर केंद्रात सत्तांतर झाले तर कॉंग्रेसची दावेदारी मजबुत राहणार आहे. त्यांनी तशी पूर्ण तयारी केली असतानाच आता कॉंग्रेसला केजरीवालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व विरोधक केवळ कॉंग्रेसच्या झेंड्याखालीच एकवटतात असे कॉंग्रेसचे मानणे आहे आणि ते खरेही आहे.
मात्र आपची भूमिका वेगळी आहे, त्यांच्या मते मोदी केवळ केजरीवाल यांनाच घाबरतात. हे नॅरेटीव्ह कॉंग्रेससाठी अनुकूल नाही. निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांत राहुल गांधी केजरीवालांच्या प्रभावात झाकोळले जाणार नाहीत याची दक्षता कॉंग्रेसला घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे रणनीतीत बदलही करावा लागेल.





