Artificially Ripened Fruits: आकर्षक दिसणारी फळे घेताय? सावधान! पिंपरी-चिंचवडमध्ये रासायनिक फळांचा धोका…वाचा सविस्तर
Artificially Ripened Fruits: शहरातील बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंबा व केळीची सर्रास विक्री; अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी.

Artificially Ripened Fruits- बाजारात मोठ्या प्रमाणावर येणारी आंबा, केळी यांसारखी फळे आकर्षक दिसावीत आणि लवकर विक्रीस यावीत यासाठी काही ठिकाणी बेकायदेशीर रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. कृत्रिम पद्धतीने पिकवलेली फळे आरोग्यास अपायकारक ठरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अन्नसुरक्षा विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
काही व्यापारी फळे लवकर पिकण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करतात. ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर या पदार्थातून ॲसिटिलीन वायू निर्माण होतो, ज्यामुळे पिकण्याची प्रक्रिया कृत्रिमरित्या वेगवान होते. अशा प्रकारच्या रसायनांचा अन्नासाठी वापर करणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी त्याचा गुपचूप वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याशिवाय इथेपॉन या द्रावणाचा तसेच इथिलीन वायूचा वापर ‘रायपनिंग चेंबर’मध्ये केला जातो. नियंत्रित पद्धतीने वापरल्यास काही प्रक्रिया मान्य असल्या तरी अनियमित आणि अतिरेकाने वापर केल्यास फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. बाहेरून पिवळे, आकर्षक दिसणारे फळ आतून कच्चे राहू शकते. अशा फळांची चव बदललेली असते आणि पौष्टिकता घटते. तज्ज्ञांच्या मते, कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांमध्ये सालीवर करडे ठिपके,
अनैसर्गिक एकसारखा रंग, विचित्र वास किंवा चव आढळू शकते. ग्राहकांनी खरेदी करताना अशा लक्षणांकडे लक्ष द्यावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारातून सावरत असलेल्यांसाठी अशी फळे हानिकारक ठरू शकतात. शहरातील घाऊक बाजारपेठा आणि फळ विक्री केंद्रांमध्ये नियमित नमुना तपासणी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्नसुरक्षा विभागाने जनजागृती मोहीम राबवून नैसर्गिकरीत्या पिकवलेली फळे ओळखण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून तक्रार नोंदविण्याचे आवाहन
फळे ही आरोग्यासाठी उपयुक्त मानली जातात; मात्र नफ्याच्या हव्यासापोटी रसायनांचा अतिरेक केल्यास तीच फळे आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहून संशयास्पद फळांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






