नवी दिल्ली – देशातील आणि परदेशातील बाजारात सोन्याचे आणि चांदीचे दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढले आहेत. अशी भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट झाली आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर गेल्या चार दिवसात बराच कमी होऊन शुक्रवारी 1 लाख 25 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.18 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 1 लाख 32 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या दरात बरीच घट झाली आहे. या कालावधीत भारतातील सोन्याचा बाजार बंद होता. दिल्ली सराफात चांदीचा दर शुक्रवारी कमी होऊन 1 लाख 52 हजार 600 रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत खाली गेला आहे. चार दिवसांपुर्वी चांदीचा दर 1 लाख 70 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता. व्यापार्यांनी सांगितले की, दिवाळीच्या अगोदर भारतीय बाजारात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर सोन्याचे दर जास्त असूनही दिवाळीच्या कालावधीत भारतीय ग्राहकांनी सोने आणि चांदीची खरेदी केली. मात्र आता उत्सव संपुष्टात आल्यानंतर दागिने खरेदी करणार्यांनी सोन्याकडे आणि चांदीकडे पाठ फिरविली आहे. जागतिक बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर 38 डॉलरने म्हणजे 0.93 टक्क्यांनी कमी होऊन 4,087 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. एचडीएफसी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, सोने आता तेजीतून करेक्शनकडे वळले आहे. सोन्याचे दर आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र चांदीच्या बाबतीत अजूनही काही प्रमाणात तेजी कायम आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन बलाढ्य तेल कंपन्या विरोधात निर्बंध जारी केले आहेत. अशा परिस्थितीत रशिया कसा प्रतिसाद देतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. जर रशियाने आक्रमक प्रतिसाद दिला तर जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण होऊन आणखी सोने आणि चांदीची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक बाजारात चांदीचा दरही 1.66 डॉलरने कमी होऊन 48.12 हॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.