पुणे जिल्हा | अर्णवी हळूंदेची जिम्नॅस्टिक स्पर्धेत चमकदार कामगिरी

पौड (वार्ताहर) – ताश्कंद (उजबेकिस्तान) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत कोंढावळे (ता. मुळशी) येथील अर्णवी राकेश हळूंदे या तेरा वर्षीय चिमुरडीने भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी केली.
अर्णवी ही भूगाव येथील श्री श्री रविशंकर शाळेमध्ये शिकते. तिला लहानपणापासून रीदमिक जिम्नॅस्टिकची आवड आहे. कोथरूड येथील अलाकृती स्पोर्ट्स क्लबमध्ये मधुरा तांबे आणि कल्याणी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने रिदमिक जिम्नॅस्टिकचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या खेळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने आतापर्यंत सहा सुवर्ण, दहा रौप्य तर आठ कास्यपदके मिळवली.
हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत भारतीय संघासाठी देशभरातून पाच मुलींची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून अर्णवीची एकमेव निवड झाली होती. ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे या स्पर्धा झाल्या. त्यात अर्णवीने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताला सहावा क्रमांक मिळाला. रीथमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचा तिरंगा जगात फडकवण्याचा तिचा संकल्प असून त्या दृष्टीने ती सराव करीत आहे.





