Army Chief Upendra Dwivedi : “युद्धात स्त्री-पुरुष असा भेद नसतो, ते लिंग-तटस्थ असतं!” एनडीएच्या संचलनात लष्करप्रमुखांचे वक्तव्य
Army Chief Upendra Dwivedi : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) ऐतिहासिक १५० व्या तुकडीचा पासिंग आऊट परेड सोहळा खडकवासला येथे शिस्तबद्ध वातावरणात संपन्न.

Army Chief Upendra Dwivedi – युद्ध आणि स्पर्धेतील सीमा धूसर होत आहे. ग्रे-झोन युद्धप्रणाली, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि बहुआयामी सुरक्षा आव्हानांमुळे सैनिकांनी केवळ कृतीक्षम नव्हे तर विचारक्षमही असणे आवश्यक आहे. युद्धभूमीवर कोणताही लिंगभेद नसतो. युद्ध नेहमी लिंग-तटस्थ असते. परेड मैदानावर महिला आणि पुरुष कॅडेट्समध्ये कोणताही फरक जाणवत नसल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या ऐतिहासिक १५० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन (पासिंग आऊट परेड) सोहळा शनिवारी (दि. ३०) दिमाखदार, शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.या सोहळ्याला मुख्य निरीक्षक म्हणून द्विवेदी उपस्थित होते. त्यांनी परेडचे निरीक्षण केले. कॅडेट्सना मार्गदर्शन करताना द्विवेदी म्हणाले, ४२ वर्षांपूर्वी मी याच मैदानावरून दीक्षांत संचलनानंतर बाहेर पडलो.
लष्करी सेवेच्या अखेरच्या टप्प्यावर नव्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. यशस्वी नेतृत्वासाठी ॲटिट्यूड (दृष्टिकोन), ॲडॅप्टॅबिलिटी (अनुकूलनक्षमता ) आणि ॲबिलिटी (क्षमता) ही तीन सूत्रे देत त्यांनी कॅडेट्सना बदलत्या परिस्थितीत सक्षमपणे नेतृत्व करण्याचा सल्ला दिला. सेवा परमो धर्मः या एनडीएच्या ब्रीदवाक्याचे स्मरण ठेवून देशसेवेच्या प्रवासाला प्रारंभ करणाऱ्या सर्व कॅडेट्सना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावर्षी भारतासह १२ मित्र राष्ट्रांतील २४ परदेशी कॅडेट्सही एनडीएमधून उत्तीर्ण झाले.
पदक विजेते
कॅडेट रोहित काजला याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. कॅडेट पीयूष रौतेलाला रौप्यपदक, कॅडेट साहिल शर्माला कांस्यपदक मिळाले. संघभावना, नेतृत्व आणि प्रशिक्षणातील उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा चीफ ऑफ स्टाफ बॅनर यंदा चार्ली स्क्वॉड्रनने मिळवला.






