Pune : चीन सीमेवरील परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशीलच

पुणे : देशाच्या उत्तरेकडील (चीन) सीमेवरील परिस्थिती स्थिर असली तरी संवेदनशीलही आहे. उत्तर सीमेवर अत्याधुनिक उपकरणे आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. मात्र, आपले लष्कर कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास तयार आणि सक्षम आहे, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी दिली.
लष्कर दिनानिमित्त बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप अँड सेंटर (बीईजी) येथे आयोजित संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लष्कराने परिवर्तन दशक या सूत्रानुसार कृती आराखडा तयार केला आहे. आपली कार्यक्षमता आणि प्रशासकीय दक्षता वाढविणे आणि युद्धसज्जता भक्कम करणे हा त्यामागचा उद्देश आहे. लष्करासाठी २०२५ हे वर्ष परिवर्तनाचे आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठीचे वर्ष असेल, असेही जनरल द्विवेदी म्हणाले.
पश्चिम सीमेच्या (पाकिस्तान) प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधी कायम असतानाही घुसखोरीचे प्रयत्नही होत आहे, असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले. जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागात संरक्षण दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मागच्या वर्षात लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक आणि अमरनाथ यात्रा शांततेत पार पडली. हे तेथील सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा झाल्याचेच निदर्शक आहे, असे जनरल द्विवेदी यांनी नमूद केले.
आपला देश विकसित भारत हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. देशाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरणाची गरज असून ते पुरवण्यात भारतीय लष्कराची भूमिका महत्त्वाची राहील. देशाची अंतर्गत सुरक्षा भक्कम राखण्यातही लष्कराचा सहभाग आहे. लष्कराच्या प्रयत्नांमुळे विविध भागातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत आपल्या जवानांनी संयम आणि परिपक्वता दर्शवत मोलाची भूमिका बजावली आहे, असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.





