Arjun bijlani : अर्जुन बिजलानीवर कोसळला दुःखाचा डोंगर; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

Arjun bijlani : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीसाठी, ‘नेहा स्वामी’साठी २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत क्लेशदायक ठरली आहे. नेहाचे वडील राकेश चंद्रा स्वामी (वय ७३) यांचे आज गुरुवारी निधन झाले. अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश चंद्रा स्वामी यांची प्रकृती अगदी उत्तम होती. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते जेवणासाठी बसले असता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका (Stroke) आला. त्यांना तातडीने बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र आज त्यांची झुंज अपयशी ठरली.
View this post on Instagram
दुबई दौरा अर्धवट सोडून अर्जुन भारतात परतला…
अर्जुन बिजलानी आपल्या कुटुंबासह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दुबईला गेला होता. दुबईला जाण्यापूर्वीच त्यांनी नेहाच्या वडिलांची भेट घेतली होती. मात्र, मंगळवारी वडिलांच्या आजारपणाची बातमी मिळताच अर्जुन आणि नेहाने तातडीने दुबई दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईत परतले.
वडिलांसमान होते सासरे !
अर्जुन बिजलानीचे त्याच्या सासऱ्यांशी अत्यंत जवळचे नाते होते. अर्जुनने अगदी कमी वयात आपल्या वडिलांना गमावले होते, त्यामुळे तो आपल्या सासऱ्यांना वडिलांच्या स्थानी मानत असे. त्यांच्या निधनामुळे अर्जुन आणि नेहावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्जुन आणि नेहाच्या लग्नाला १३ वर्षांहून अधिक काळ झाला असून ते मनोरंजन विश्वातील एक लाडकं जोडपं मानलं जातं. या कठीण काळात अर्जुनच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राकेश चंद्रा स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.





