Satara | महायुतीतर्फे फलटणमध्ये सचिन कांबळे- पाटील यांचा अर्ज दाखल

फलटण (प्रतिनिधी) – महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने फलटण- कोरेगाव राखीव मतदार संघातून सचिन सुधाकर कांबळे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवार, दि. 28 रोजी मोठे शक्तीप्रदर्शन करत खा. नितीन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत दाखल केला.
महायुतीतील जागा वाटपामध्ये फलटण कोरेगाव मतदार संघ हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेला आहे. भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सचिन कांबळे पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.
सोमवारी 11 वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून भव्य शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर आणि महायुतीतील सर्व नेते मंडळी उपस्थित होते.
अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सदर केला. यावेळी सचिन कांबळे-पाटील आपला विजय निश्चित असून जनता पाठीशी असल्याने मोठ्या मताधिक्याने आपण विजय मिळवू, असा आशावाद व्यक्त केला.





