Satara | फलटण-कोरेगाव मतदारसंघात भाजपचा आमदार असेल

फलटण ( प्रतिनिधी) – फलटण-कोरेगाव मतदारसंघ भाजपला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत फलटण-कोरेगाव मतदारसंघात निवडून येणारा आमदार हा देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा असेल असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खुबा यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे प्रभारी भगवंत खुबा हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या निवासस्थानी भेट दिली तेव्हा ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रभाकर जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,फ लटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, महादेव पोकळे माजी नगरसेवक अजय माळवे, सचिन अहिवळे, युवानेते रणजितसिंह भोसले, अमोल सस्ते, जिल्हाउपाध्यक्ष संदीप चोरमले, रियाजभाई इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खुबा म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनमत मिळाले होते. त्यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची कोणतीही ऑफर दिलेली नव्हती किंवा शब्दही दिला नव्हता. परंतु, शरद पवारांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री केले.
अडीच वर्षात महाराष्ट्र विकासात मागे पडला, त्यानंतर आपण गप्प बसून राहिलो नाही राज्यात सत्ता स्थापन केली. आज महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत आहे, तसेच कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत आहेत.
त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे 140 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे.
महाविकास आघाडीला हद्दपार करा
फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जागा भाजपला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासाचा व विचारांचा असणार आहे.
मेलेल्या काँग्रेला लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी जिवंत केले. परंतु, ही काँग्रेस परकीयांच्या माध्यमातून पाकिस्तान व बांगलादेश प्रमाणे मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातुन आघाडीला हद्दपार करा व महायुतीचे सरकार निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले .





