Satara | ‘अमृत 2.0’मधून फलटणला मिळणार कोट्यवधींचा निधी

फलटण, (प्रतिनिधी) – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या ‘अमृत 2.0’ योजनेतून फलटण शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी (दि. 29) दिल्लीमध्ये केंद्रीय शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. रणजितसिंह यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय शहर विकास मंत्री हरजितसिंग पुरी यांना पत्र देऊन, माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व पंढरपूरचा ‘अमृत 2.0’ योजनेत समावेश करून, निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची केंद्रीय अर्थसंकल्पात दखल घेऊन, फलटण व पंढरपूरचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत राज्यातील 32 गावांचा समावेश झाला असून, 31 हजार 722 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शहरांचा 20 वर्षांपुढील डीपी प्लॅन तयार होणार आहे.
शहरांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुरेशा पाण्यासाठी नियोजन, वितरण व्यवस्थेतील पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन, घरोघरी नळ कनेक्शन, शहराला पुरेल एवढ्या पाण्याचा बॅलन्स टँक, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,
शहरातील झाडे जगवण्यासाठी योजना, पाण्याच्या वापराबाबत जनजागृती आदी गोष्टी होणार आहेत. या योजनेतून लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यातून शहरांचा कायापालट होणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.





