पुणे | माधुरी मिसाळ यांचा अर्ज दाखल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी शक्तिप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
सारसबाग येथील गणपती आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मिसाळ यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पद्मावती, अण्णा भाऊ साठे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, निवडणूक प्रमुख दीपक मिसाळ, गणेश बीडकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, करण मिसाळ, संतोष नांगरे, प्रशांत दिवेकर, सुधीर कुरुंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, सलग चौथ्यांदा भाजपच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. गेली पंधरा वर्षे केलेली विकासकामे आणि सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास वाटतो.





