पिंपरी | बापूसाहेब भेगडे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मावळ, (प्रतिनिधी) – मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोर बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देश पत्र दाखल केले आहे. सोमवारी (दि.२८) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत बापूसाहेब भेगडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला, यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख हेही उपस्थित होते.
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासोबतच बापूसाहेब भेगडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला होता. पंचायत समिती चौक वडगाव मावळ येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत तालुक्यातील भाजपाचे बहुतांश प्रमुख नेते, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, इतर काही उपस्थित होते. तसेच भेगडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





