Nagar | महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगिंग डे साजरा

राहुरी (प्रतिनिधी): महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात अँटी रॅगिंग डे साजरा करण्यात आला. भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्तिमत्व विकास व्हावा,
शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने 12 ते 18 ऑगस्ट हा राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित केले होते. त्याअनुषंगाने अँटी रॅगिंग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पदव्युत्तर महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ. सुनील भणगे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, वसतीगृहाचे मॉनिटर डॉ. दिलीप देवकर व प्रभारी सहाय्यक कुलसचिव किरण शेळके उपस्थित होते.
डॉ. सुनील भणगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्यासाठी सूचित केले. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याविषयीही काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी रॅगिंग म्हणजे काय, अँटी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. या सर्व माहितीचे पाॅवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. याप्रसंगी डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंगची शपथ दिली. वसतीगृहाचे मॉनिटर डॉ. राजेंद्र क्षीरसागर, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





