अंधेरी पोटनिवडणूक : राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; “आम्ही काय करावं…”

मुंबई : सहानुभूतीचा विचार करून भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये. अशा आशयाचे पत्र राज ठाकरेंनी लिहिले आहे. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत “आम्ही काय निर्णय घ्यावा, हे पक्षाचं नेतृत्व ठरवेल”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रसाद लाड याची राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही राज ठाकरे यांचा आदर करतो. राज ठाकरेंचं मत हे त्यांचं वैयक्तिक किंवा त्यांच्या पक्षाचं मत असू शकतं. भारतीय जनता पार्टीने कोणता निर्णय घ्यावा? यावर पक्षाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार निर्णय घेतील. त्यांनी कोणत्या भावनेतून पत्र लिहिलंय? याची आम्हाला माहिती नाही. या विषयावर काहीही चर्चा झाली नाही. तरीदेखील याचा सर्वतोपरी निर्णय पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचे नेते घेतील, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.
प्रसाद लाड यांनी यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “अरविंद सावंत आणि त्यांच्या पक्षनेतृत्वाला सहानुभूतीवर जगण्याची सवय पडली आहे. उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर सहानुभूतीचंच राजकारण केलं. सरकार चालवतानाही त्यांनी सहानुभूती दाखवली. करोनामध्येही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. सहानुभूतीच्या नादात उद्धव ठाकरेंनी खड्ड्यात जाण्याचं काम केलं आहे. आता अरविंद सावंतांनाही त्यांच्या सहानुभूतीची सवय लागली आहे.”असा टोला देखील यावेळी लाड यांनी लगावला आहे.





