Nana Patekar :..अन् नानांनी मला खरोखरचं कानाखाली मारली! मग मीही…; अभिनेत्री मधू शाहने 29 वर्षांनी केला खुलासा
Nana Patekar : मधूच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील एका भावनिक दृश्याचे चित्रीकरण सुरू होते. त्या दृश्यात नाना पाटेकर यांच्या पात्राने तिच्या पात्राला मारायचे होते.

Nana Patekar : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि कडक स्वभावासाठीही ओळखले जातात. अनेक कलाकारांनी त्यांच्या कामाच्या शैलीबाबत विविध अनुभव सांगितले आहेत. आता अभिनेत्री मधू शाह हिने जवळपास 29 वर्षांनंतर ‘यशवंत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. (Nana Patekar )
‘रोजा’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या मधू शाहने एका मुलाखतीत सांगितले की, 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यशवंत’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी नाना पाटेकर यांनी तिला एका सीनच्या शूटवेळी खरोखरच कानाखाली मारली होती. मात्र, त्याच क्षणी तिनेही त्यांना प्रत्युत्तर म्हणून थप्पड लगावली होती. (Nana Patekar )
मधूच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील एका भावनिक दृश्याचे चित्रीकरण सुरू होते. त्या दृश्यात नाना पाटेकर यांच्या पात्राने तिच्या पात्राला मारायचे होते. पण अभिनयाचा आभास निर्माण करण्याऐवजी नानांनी तिला प्रत्यक्ष आणि जोरात खरोखरची कानाखाली मारली. या अनपेक्षित प्रकारामुळे ती संतापली आणि कोणताही विचार न करता तिनेही त्यांना थप्पड मारली. (Nana Patekar)
यशवंत चित्रपटातील एक सीन
हेही वाचा : Pusegaon News : वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाचा कोरेगाव तालुक्याला तडाखा; नागरिकांची धावपळ
“नानांनी मला खरोखर मारलं आणि मला खूप राग आला. मी माझा संयम गमावला आणि लगेचच त्यांना प्रत्युत्तर दिलं. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हणण्यापूर्वीच हे सगळं घडलं होतं.” असं मधूने सांगितलं.
या घटनेनंतर काही काळ सेटवर शांतता पसरली होती. मात्र, मधूने आपली भूमिका ठामपणे मांडली. “कोणीही मोठा कलाकार असला तरी त्याला दुसऱ्याला प्रत्यक्ष मारण्याचा अधिकार नाही. जर दृश्यासाठी थप्पड दाखवायची होती, तर ती अभिनयातून दाखवता आली असती,” असं स्पष्ट मत तिने व्यक्त केले.
मधूने स्पष्ट केले की, हा तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता आणि त्यामुळेच तिने तत्काळ प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, या घटनेनंतर कोणताही वाद वाढला नाही. उलट नाना पाटेकर यांनी परिस्थिती शांतपणे हाताळली. (Nana Patekar)
मधूने सांगितलं की, नानांनी तिच्या भावनांचा आदर केला आणि त्यांचा उद्देश तिला दुखावण्याचा नव्हता, तर दृश्य अधिक वास्तववादी वाटावे यासाठी त्यांनी तसे केल्याचे सांगितले. त्यांनी आपली चूकही मान्य केली आणि त्यानंतर दोघांमधील मतभेद तिथेच संपले. (Nana Patekar )
1997 मध्ये प्रदर्शित झालेला ‘यशवंत’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. पडद्यावर पती-पत्नीची भूमिका साकारणाऱ्या नाना आणि मधू यांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, पडद्यामागे घडलेला हा ‘थप्पड किस्सा’ आता अनेक वर्षांनंतर चर्चेत आला आहे.
हेही वाचा : Karisma Kapoor: ऋषी कपूर यांच्या ‘या’ गाण्याची आठवण झाली की भावूक होते करिश्मा कपूर; सांगितला खास किस्सा





