“वयाच्या पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं वाटतंय”; नाना पाटेकरांचे निवृत्तीचे संकेत

Nana Patekar | अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. मात्र रविवारी ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या निवृत्तीच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात नाना पाटेकर उपस्थितांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान ते म्हणाले, “आजवर खूप काम केलं आहे. त्यामुळे आता मनासारखं जगावं असं वाटत आहे. १ जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घेऊन त्यांच्यासाठी काही करावं, असं वाटतं. नाम फाउंडेशनची धुराही आता मकरंदनेच पुढे घेऊन जावी,’ अशी भावना नाना पाटेकरांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
‘आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या…’
यापुढे नाना पाटेकरांनी म्हटलं की, “पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं, असं वाटतंय. म्हणजे ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल, अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती करेनही. पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या, शिवाय कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच…” अशी भावनाही नाना पाटेकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. Nana Patekar |
“नाम’ची पुढची पिढी उत्तम पद्धतीनं आमचं काम पुढे नेत असून कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. आता त्यांनी हे काम पुढे न्यावं. ‘नाम’चं पुढील काम मकरंद ठरवेल. मी असेन, तरंच काम करीन, ही त्याची भूमिका चुकीची आहे. ‘नाम’सारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या, तरी समस्या सुटणार नाही”, असंही नाना पाटेकर म्हणाले.
नाना पाटेकरांना ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’ यासारख्या चित्रपटांमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. अलिकडेच ते ‘हाऊसफुल-५’ चित्रपटात पाहायला मिळाले. Nana Patekar |
हेही वाचा :





