Taapsee Pannu : ‘ब्लॅक होलसारखा आहे सोशल मीडिया’; वर्षभर सोशल मीडियावरून गायब तापसी पन्नूचा कमबॅक करताच मोठा खुलासा
Taapsee Pannu : ती त्यासाठी कोणालाही पैसे देत नाही. तिचे सोशल मीडिया प्रोफाइल तिच्या खऱ्या आयुष्यासारखेच नैसर्गिक आणि अनफिल्टर्ड आहे.

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu ) जवळपास वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा डिजिटल विश्वात पुनरागमन केले आहे. या कमबॅकनंतर चाहत्यांनी तिच्या अचानक गायब होण्याबाबत प्रश्न विचारले असता, तापसीने यामागील कारणांबाबत मोठा खुलासा केला आहे.
सोशल मीडियावरील सततचा दबाव, ट्रेंड्सची शर्यत आणि कायम सक्रिय राहण्याची अपेक्षा. या गोष्टींमुळे ती मानसिकदृष्ट्या थकली होती. त्यामुळे पडद्यावरील नव्हे तर खऱ्या आयुष्यातील स्वतःला वेळ देण्याचा निर्णय तिने घेतला. त्यामुळे ती सोशल मीडियापासून अलिप्त राहिली. (Taapsee Pannu )
खरंतर तापसी सोशल मीडियावर कमी सक्रिय झाल्यानंतर मित्र आणि चाहत्यांकडून ‘सगळं ठीक आहे ना?’, ‘तू कुठे गायब झालीस?’ असे प्रश्न काळजीपोटी विचारण्यात आले.

Taapsee Pannu : ‘ब्लॅक होलसारखा आहे सोशल मीडिया’; वर्षभर सोशल मीडियावरून गायब तापसी पन्नूचा कमबॅक करताच मोठा खुलासा
सोशल मीडियावर परतल्यानंतर तापसीने स्पष्ट केले की, तिचे सोशल मीडियावरील अकाउंट कोणतीही व्यावसायिक टीम हाताळत नाही. ती त्यासाठी कोणालाही पैसे देत नाही. तिचे सोशल मीडिया प्रोफाइल तिच्या खऱ्या आयुष्यासारखेच नैसर्गिक आणि अनफिल्टर्ड आहे.
हेही वाचा : Home made Protein Powder: महागड्या सप्लिमेंट्सला पर्याय; घरच्या घरी तयार करा नैसर्गिक प्रोटीन पावडर
तिने सांगितले की, आजच्या काळात अनेक कंपन्या आणि ब्रँड्स सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेल्या कलाकारांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे कमी पोस्ट केल्यामुळे काही ब्रँड्सनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. जाहिराती हे कलाकारांसाठी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असले तरी सोशल मीडिया आता केवळ मार्केटिंगचे माध्यम बनल्याची खंतही तिने व्यक्त केली. (Taapsee Pannu )
या प्रवृत्तीवर टीका करत तापसी म्हणाली, “जर एखादा ब्रँड माझी निवड माझ्या व्यक्तिमत्त्वासाठी करत असेल, तर त्यांच्यासाठी मला दुसऱ्याच व्यक्तीसारखे वागण्याची गरज का भासावी? मग माझी स्वतःची ओळख कुठे राहते?” (Taapsee Pannu)
तापसीने सोशल मीडिया वापरण्याच्या अतिरेकावरही भाष्य केले. “इन्स्टाग्राम उघडल्यावर माणूस वेडा होऊ शकतो. सोशल मीडिया म्हणजे तुम्हाला आत खेचून घेणाऱ्या ब्लॅक होलसारखा आहे. त्यामध्ये स्वतःचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या मानसिक शक्तीची गरज असते.”
तापसीने सांगितले की, सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय तिने कोणताही गाजावाजा न करता स्वतःच्या मनःशांतीसाठी घेतला होता. सतत नवीन ट्रेंड्सच्या मागे धावण्यापेक्षा तिला वास्तव आयुष्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तिने आपल्या फोनमधून सर्व सोशल मीडिया अॅप्स हटवले.
सध्या तापसी तिचा पती मॅथियास बो आणि कुटुंबासोबत डेन्मार्कमध्ये वेळ घालवत आहे. मुंबईच्या धावपळीपासून दूर ती स्वयंपाक, बागकाम, व्यायाम आणि सायकलवरून बाजारात जाण्यासारख्या साध्या गोष्टींचा आनंद घेत असून, याच गोष्टी तिला जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यास मदत करत असल्याचे तिने सांगितले.





