Pune District : मृत्यूनंतरही अडथळ्यांची शर्यत; मृतदेहाला घरापर्यंत आणण्यासाठी रस्त्याविना तारेवरची कसरत
Pune District : गावकी-भावकीच्या वादातून हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला असून गेल्या दोन वर्षांपासून संबंधित रस्ता अडवण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

बेल्हे : जिवंतपणी रस्त्यासाठी संघर्ष करणार्या नागरिकांना आता मृत्यूनंतरही हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे विदारक चित्र जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील दत्तनगर, आवटी-चिंचोले मळा परिसरात समोर आले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या वादामुळे एका मृत व्यक्तीचे पार्थिव घरी आणण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गावकी-भावकीच्या वादातून हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला असून गेल्या दोन वर्षांपासून संबंधित रस्ता अडवण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबतचे प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित असून सुनावणी सुरू आहे. मात्र, तोडगा न निघाल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत. दरम्यान, सोमवारी (दि. 22) दुपारी परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले. मृतदेह घरी आणण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुःखद प्रसंगातही मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना रस्त्याअभावी मनस्ताप सहन करावा लागल्याने परिसरातील नागरिक भावूक झाले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित रस्ता गट क्रमांक 29, सर्वे क्रमांक 29 तसेच शासकीय चारी क्षेत्राशी संबंधित असून तो पिंपळगाव जोगा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे पाटबंधारे विभाग, महसूल प्रशासन आणि तहसील कार्यालयाने संयुक्त पाहणी करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राजाराम बापू पिंगट, नारायण बापू पिंगट, उज्वला रोहिदास घोडे, पूनम सागर घोडे, लक्ष्मण बबन पिंगट, प्रमोद विठ्ठल पिंगट, बाबुराव बापू पिंगट, चिमा भरत पिंगट, हरिदास नागू पिंगट आणि धोंडीबा बापू पिंगट यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तान्हाजी पिंगट व देविदास पिंगट यांनीही या घटनेची माहिती देत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
दत्तनगर, आवटी-चिंचोले मळा येथील बंद रस्ता तात्काळ खुला करावा. गट क्रमांक 29, सर्वे क्रमांक 29 व शासकीय चारीची अधिकृत मोजणी करावी. पिंपळगाव जोगा पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि तहसील प्रशासनाने संयुक्त पाहणी करावी. प्रलंबित दावा तातडीने निकाली काढून नागरिकांना कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा.





