राष्ट्रवादीच्या दोन बड्या मंत्र्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न? भाजपची नाशिकमध्ये मोठी राजकीय खेळी

Politics of Nashik : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भाजपने येथे मोठी राजकीय खेळी करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
आगामी स्थानिक निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले सिन्नरचे उदय सांगळे आणि दिंडोरीच्या सुनीता चारोस्कर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप राज्यात ठिकठिकाणी आपली ताकद वाढवताना दिसत आहे. सांगळे आणि चारोस्कार या दोघांचा पक्षप्रवेश उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही त्यांच्या शेकडो समर्थकांसह आपल्या हाती कमळ घेणार आहेत.
भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांनी विद्यमान मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान, या प्रवेशाच्या चर्चांना जोर मिळल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रक काढत दोघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भाजपचा नाशिकमध्ये माईंड गेम?
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदार संघातून विद्यामान क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे निवडून आलेले आहेत. त्यांच्या राजकीय कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या उदय सांगळे हे भाजपात दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे दिंडोरीत राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढलेल्या चारोस्कर दाम्पत्य आपल्या हाती कमळ घेणार असल्याने आगामी काळात मोठी राजकीय उलथामालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या विरोधकांना आपल्या गोटात घेऊन भाजपने राजकीय शह दिल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : जेडी व्हान्सच्या पत्नीच्या धर्मांतराच्या विधानाने खळबळ ; व्हान्स यांच्यावर सर्व स्तरातून टीका





