“धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की….” ; राज ठाकरेंची ‘पुन्हा शिवाजीराजे’ भोसले सिनेमाविषयची पोस्ट चर्चेत

Raj Thackeray Post : जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाचा अर्थात शेतकऱ्याला म्हटले जाते. पण हा बळीराजा निसर्गाच्या अघटित प्रकोपामुळे त्रस्त आहे. कधी पाऊस व्हावा यासाठी आर्त हाक देतो, तर कधी पाऊस थांबवा यासाठी आशेने डोळा लावून बसतो. या धांदलीत शेतकऱ्यावर आर्थिक संकटांचा डोंगर उभा राहतो.
यातून सुटका करण्यासाठी तो अनेक प्रयत्न करतो पण शेवटी जो मार्ग पत्कारायचा नाही पाहिजे, तोच मार्ग त्याच्या नशिबात येतो. आत्महत्या…हाच ज्वलंत विषय मराठीतील नावाजलेले दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात मांडला आहे.
या सिनेमाला चांगला प्रतिसाद प्रेक्षक देताना दिसत आहेत. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी कल्पना घेऊन सिनेमाची कथा दाखवण्यात आलेली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सिनेमाविषयी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी सिनेमाचे कौतुक करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : “मी केलेल्या कामाच्या २ टक्के कामही सध्याचे लोकप्रतिनिधी करू शकले नाही”; सुजय विखेंचा लंकेंवर निशाणा
राज ठाकरे यांची पोस्ट
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही… आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो, असे म्हणत राज यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
एका बाजूला पाऊस झोडपतो आणि…..
हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे. या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे, असे म्हणत राज यांनी वास्तव परिस्थितीवर भाष्य केले आहे.
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे… pic.twitter.com/Xum0x5Gfxz
— Raj Thackeray (@RajThackeray) November 2, 2025
तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा…
एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे. हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल, असेही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सिनेमाच्या टीमचे कौतुक
या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा…
पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील लक्ष वेधून घेणारी भूमिका आहे. हा सिनेमा ३१ अॅाक्टोबरला थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे.





