कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बेकायदा घुसखोरीच्या मुद्द्यावरून हे वादग्रस्त वक्तव्य केले. नदिया जिल्ह्यात पत्रकारांनी महुआ मोइत्रा यांना राज्यातील बेकायदा घुसखोरीबाबत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना तृणमूलच्या खासदार म्हणाल्या, “माझा अमित शाह यांना थेट प्रश्न आहे. ते फक्त घुसखोर… घुसखोर… घुसखोर असेच म्हणत आहेत. आमच्या सीमेचे रक्षण करणारी यंत्रणा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. पंतप्रधानांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून सांगितले की, घुसखोरी होत आहे आणि त्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल होत आहेत. जेव्हा पंतप्रधान हे बोलत होते, तेव्हा पहिल्या रांगेत बसलेले गृहमंत्री त्यांचे ऐकून हसत होते आणि टाळ्या वाजवत होते.” पुढे त्या म्हणाल्या, “जर भारताच्या सीमांचे रक्षण करणारा कोणीच नसेल, जर दुसऱ्या देशातील लोक रोज शेकडो, हजारो आणि लाखोंच्या संख्येने घुसखोरी करत असतील, आमच्या माता-भगिनींवर नजर ठेवत असतील, आमची जमीन हिसकावत असतील, तर सर्वप्रथम अमित शाह यांचे शीर कापून टेबलवर ठेवले पाहिजे. जर गृहमंत्री आणि गृह मंत्रालय भारताच्या सीमांचे रक्षण करू शकत नसेल आणि पंतप्रधान स्वतः म्हणत असतील की बाहेरून येणारे लोक आमच्या माता-भगिनींवर नजर ठेवत आहेत आणि आमची जमीन हिसकावत आहेत, तर यात चूक कुणाची आहे? आमची आणि तुमची चूक आहे का? इथे तर बीएसएफ आहे. आम्हीही त्यांच्यापासून घाबरून राहतो. बांगलादेश हा आमचा मित्रदेश होता, पण तुमच्यामुळे गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे.” या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार स्थानिक रहिवासी संदीप मजूमदार यांनी दाखल केली आहे. महुआ मोइत्रा यांनी या तक्रारीवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.