Eknath Khadse : ‘अमित शाहांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती पण…’; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
Eknath Khadse : मात्र, आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse : शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी खडसे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशांना जोर आला होता. मात्र, आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच शेवटपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, “मला भाजपमध्ये प्रवेश करण्यामध्ये कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे. माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील, पण मी जाणार नाही.”
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
“मी दिल्लीला गेलो असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला स्वतः फोन करून बोलावले होते. त्यांनी मला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची ऑफर दिली होती.” असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच खडसे यांनी आरोप केला की, त्यांच्या भाजप प्रवेशाला काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. “माझा पक्षप्रवेश झाला तर आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली. ‘खडसे को लिया तो सीट गिरा देंगे’ अशा प्रकारचा दबावही टाकण्यात आला.”
गिरीश महाजनांविषयी म्हणाले…
भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना त्यांची थेट दिल्लीपर्यंत हॅाटलाईन असल्याची मिश्किल टिप्पणी केली होती. तर आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी बोलताना “गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत मी त्यांना सर्व प्रकारे मदत केली. मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाच्या पाठिंब्यामुळेच त्यांना ओळख मिळाली.” असे वक्तव्य केले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपकडून अॅाफर मिळाल्याच्या गौप्यस्फोटवर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या दाव्यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 कधी मिळणार? संभाव्य तारीख समोर






