Amit Shah : “देशाला नक्षलवादमुक्त बनवणारच” – अमित शहा

Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी देशाला ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त बनवण्याच्या निर्धाराचा पुनरूच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत देश सुरक्षित बनला आहे. काही वर्षांपूर्वी देशातील ११ राज्यांमध्ये नक्षलवाद फैलावला होता. आता तो केवळ ३ जिल्ह्यांमध्येच अस्तित्वात आहे, असा दावा त्यांनी केला.
उत्तरप्रदेशातील नागरिक पोलीस कॉन्स्टेबल्सना नियुक्तीपत्रे प्रदान करण्याच्या सोहळ्यात शहा बोलत होते. दहशतवादाच्या मुद्द्यावरून त्यांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. देशात कॉंग्रेसची सत्ता असताना दहशतवादी हल्ले नित्याची बाब बनली होती. मोदींच्या कार्यकाळात पाकिस्तानच्या पाठिंब्याने ३ दहशतवादी हल्ले घडले.
त्यानंतर मोदींनी प्रत्येकवेळी भारतीयांवर हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा स्पष्ट संदेश संपूर्ण जगाला दिला. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर एअर स्ट्राईकने देण्यात आले. तर, पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मोदींच्या नेतृत्वाखाली पोलीस दलांचे देशव्यापी आधुनिकीकरण सुरू झाले. मात्र, उत्तरप्रदेशात भाजप सत्तेवर आल्यानंतर ती प्रक्रिया २०१७ वर्षीपासून सुरू झाली, अशी भूमिकाही शहा यांनी मांडली. संबंधित सोहळ्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेश सरकारमधील प्रमुख मंत्री उपस्थित होते.





