Amit Shah : दहशतवादी नेटवर्कला थारा देऊ नये; बिम्स्टेक गृहमंत्र्यांच्या बैठकीत अमित शाह यांचे आवाहन
हशतवादी गटांना आश्रय मिळण्यापासून, तळ आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्यापासून, सामुग्री एकत्रित करण्यापासून किंवा इतर सदस्य देशांविरुद्ध कारवाया करण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक निर्धार करण्याचे आवाहन शाह (Amit Shah) यांनी केले.

Amit Shah : दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी, दहशतवादी वित्तपुरवठा आणि संघटित गुन्हेगारीला खीळ घालण्यासाठी, तसेच दहशतवादी नेटवर्कला या प्रदेशात आश्रय मिळणार नाही यासाठी बिमस्टेक देशांमध्ये अधिक मजबूत प्रादेशिक सहकार्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी केले. भारत दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबतो, असे बिम्स्टेक देशांच्या पहिल्या गृहमंत्री बैठकीला संबोधित करताना शहा म्हणाले.
प्रत्येक सदस्य देशाच्या सुरक्षा व्यवस्थांनी इतर सदस्यांच्या सुरक्षेत योगदान द्यावे, या विश्वासाने बिम्स्टेक देशांच्या भागीदारीमागील विश्वास अधिक दृढ होतो. दहशतवादी गटांना आश्रय मिळण्यापासून, तळ आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्यापासून, सामुग्री एकत्रित करण्यापासून किंवा इतर सदस्य देशांविरुद्ध कारवाया करण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक निर्धार करण्याचे आवाहन शहा (Amit Shah) यांनी केले.
त्यांनी सर्व सदस्यांना त्यांच्या राष्ट्रीय कायद्यांनुसार आणि लागू करारांनुसार परस्पर कायदेशीर सहाय्य आणि प्रत्यार्पणामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले, तसेच अशा सहकार्यामुळे गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल असे सांगितले. दहशतवादविरोधी कारवाई आणि कायद्याची अंमलबजावणी ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यमान नोडल एजन्सींमार्फत कार्यवाहीयोग्य गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्याचे आणि दहशतवादी वित्तपुरवठा व संघटित गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी अधिक समन्वय साधण्याचे आवाहन देखील शहा यांनी केले. अमली पदार्थांच्या तस्करीची समस्या केवळ एका देशाच्या प्रयत्नांनी थांबवता येणार नाही. आपल्याला संपूर्ण प्रदेशाचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.
अमली पदार्थांपासून मिळणारा अवैध पैसा संघटित गुन्हेगारीला आर्थिक बळ देतो आणि त्याचा वापर दहशतवादी निधीसाठीही केला जातो. पूर्व-रासायनिक पदार्थांचे आणि डार्क वेबमार्फत होणारे व्यवहार या आव्हानाला आणखी गुंतागुंतीचे बनवतात, असे ते (Amit Shah) म्हणाले. बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बिम्स्टेक हा बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश असलेला एक प्रादेशिक गट आहे.






