India Politics : ‘राहुल गांधींना 2029 मध्येही पराभवाला सामोरे जावे लागेल’ – अमित शाह
India Politics : अमित शाह यांनी राहुल गांधींवर SIRच्या नावाखाली घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. 2029 मध्ये NDAच्या विजयाचा आणि काँग्रेसच्या पराभवाचा दावा केला.

India Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शाह म्हणाले, राहुल गांधी हे SIRच्या नावाखाली घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील जनतेला त्यांची रणनीती समजली असून जनता आता त्यांच्या म्हणण्याला बळी पडणार नाही.
2029 च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पराभवासाठी तयार राहावे. 2029 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेत येईल आणि काँग्रेसला सलग चौथ्यांदा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, असा दावा शाह यांनी केला.
‘मोठी गर्दी जमवून देशाचा आवाज बनता येत नाही’
शाह पुढे म्हणाले, राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख नेते झाल्यापासून पक्षाला सातत्याने निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागत आहे. 14 पक्षांचे कार्यकर्ते एकत्र करून दीड किलोमीटरच्या परिसरात सुमारे 8 हजार लोकांची गर्दी जमवली म्हणून ती देशाची जनता ठरत नाही. काँग्रेस सध्या ज्या पद्धतीने नकारात्मक राजकारण करत आहे, त्याचा पक्षाला फायदा होणार नाही. भारतातील जनता आता राहुल गांधी यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणार नाही, असेही शाह यांनी सांगितले.
गुजरातच्या निकालाचाही दिला दाखला –
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचाही अमित शाह यांनी उल्लेख केला. गुजरातमधील दोन नगरपालिका आणि एका महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 104 पैकी 90 जागा भाजपने जिंकल्या. गांधीनगर महापालिकेच्या 44 पैकी 38 जागांवर भाजप विजयी झाल्याचे शाह यांनी सांगितले. आम आदमी पक्षाने 32 जागांवर निवडणूक लढवली आणि सर्व 32 जागांवर त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. गुजरातमधील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे ते म्हणाले.
‘मोदींची लोकप्रियता SIRच्या नावाने नाकारता येणार नाही’
SIRच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम बंगाल, पुडुचेरी आणि तामिळनाडू येथे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, असा दावा त्यांनी केला. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. हा निकाल राहुल गांधी यांच्यासाठी धडा आहे.
त्रिपुरातील निवडणुकीचाही उल्लेख –
त्रिपुरातील ग्राम समित्यांच्या निवडणुकीतही NDAला मोठे यश मिळाल्याचा दावा अमित शाह यांनी केला. एकूण 4,600 जागांपैकी 3,248 जागा आणि अन्य 900 जागा मिळून NDAने 4 हजारांहून अधिक जागा जिंकल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत 77.5 टक्के मतांचा वाटा मिळाला.
निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांवरही शाह यांनी टीका केली. त्रिपुरातील ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती. त्यामुळे भाजपला केवळ ईव्हीएममुळे विजय मिळतो, हा दावा चुकीचा असल्याचे शाह म्हणाले.





