‘अमित शहांना गृह मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही!’ – उद्धव ठाकरे

मुंबई -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेषांतराबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करणाऱ्या व्यक्तीला देशाच्या गृह मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही, असा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी केला.
राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याआधी दिल्लीला जाऊन शहांच्या भेटी घेतल्या. त्यासाठी वेषांतर करून विमानाने प्रवास केला, असे गुपित अजित पवार यांनी नुकतेच उघड केले. त्यावर उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आपल्या विमानतळांची सुरक्षा व्यवस्था किती बोगस आहे ते यातून समोर आले. राज्याचा विरोधी पक्षनेता वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो ती बाब गंभीर आहे. सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊन अशा गोष्टी करणे गृहमंत्र्यांना मान्य आहे का? ते पदाचा गैरवापर करत आहेत, असे उद्धव म्हणाले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. उद्धव आणि आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांवर खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला. त्यावरून तिखट शब्दांत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले.
अत्यंत घृणास्पद कामं करणारी लोकं सत्तेवर बसली आहेत. हे अमानुष स्वरूपाचे आहे. ती लोकं कुटूंबं बघत नाहीत. मुलाबाळांवर घाणेरडे आरोप करून त्यांचं आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही मुलं आहेत.
त्यांच्या मुलांना घाणेरड्या, खोट्यानाट्या आरोपांत गोवण्याचा प्रयत्न झाल्यावर आई-वडिलांचं दु:ख काय असतं ते त्यांना कळेल. पूर्वीचा भाजप वेगळा होता. आताचा भाजप घृणास्पद आणि अमानुषपणे काम करणारा आहे. ती वृत्ती राज्यातून नष्ट झाली पाहिजे, असे भाष्य त्यांनी केले.





