अमित शाह यांची मोठी घोषणा: 170 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, अबुझमढ आणि उत्तर बस्तर नक्षलमुक्त

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी छत्तीसगडमधील अबुझमढ डोंगराळ वनक्षेत्र परिसर आणि उत्तर बस्तर हे नक्षलमुक्त घोषित केले. शाह यांनी सांगितले की, “आज १७० नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केले आहे. काल २७ नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली होती, तर महाराष्ट्रात ६१ नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात पुनरागमन केले. गेल्या दोन दिवसांत एकूण २५८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडला आहे.”
२०२४ नंतरची नक्षलविरोधी मोहिमेत मोठी कामगिरी –
अमित शाह यांनी माहिती दिली की, जानेवारी २०२४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर छत्तीसगडमध्ये आतापर्यंत २,१०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, १,७८५ जणांना अटक करण्यात आली असून ४७७ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.
ही आकडेवारी केंद्र सरकारच्या नक्षलवाद निर्मूलनाच्या ठोस भूमिकेचे प्रतीक असल्याचे शाह यांनी नमूद केले.
अबुझमढ आणि उत्तर बस्तर नक्षलमुक्त –
शाह म्हणाले, “अबुझमढ आणि उत्तर बस्तर हे एकेकाळी नक्षलवाद्यांचे गड मानले जात होते. आज ही दोन्ही क्षेत्रे नक्षल दहशतीपासून मुक्त झाली आहेत, हे अत्यंत आनंददायी आहे.” त्यांनी सांगितले की, सध्या फक्त दक्षिण बस्तर भागात थोडी नक्षल चळवळ शिल्लक असून ती देखील लवकरच संपवली जाईल.
A landmark day in our battle against Naxalism.
Today, 170 Naxalites have surrendered in Chhattisgarh. Yesterday 27 had laid down their arms in the state. In Maharashtra, 61 returned to the mainstream, yesterday. In total, 258 battle-hardened left-wing extremists have abjured…
— Amit Shah (@AmitShah) October 16, 2025
मुख्य प्रवाहात येणाऱ्यांचे स्वागत, हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई –
शाह म्हणाले, “जे आत्मसमर्पण करतील त्यांचे सरकार स्वागत करेल, परंतु जे अजूनही बंदुकीच्या मार्गावर आहेत, त्यांना आमच्या सुरक्षा दलांचा कठोर प्रत्युत्तर मिळेल.” त्यांनी उर्वरित नक्षलवाद्यांना शस्त्र खाली ठेवण्याचे आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने समाजात सहभागी होण्याचे आवाहन केले.
शेवटी शाह यांनी स्पष्ट केले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यास कटिबद्ध आहे. आजचा दिवस हा त्या लढ्यातील ऐतिहासिक टप्पा आहे.”





