हरियाणाच्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा ‘या’ दिवशी होणार; पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Haryana Government Oath Ceremony | हरियाणात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे. पंचकुला येथील परेड मैदानावर सकाळी 10 वाजता भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होईल. पंतप्रधान मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याला सुमारे 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भाजप नेते नायब सिंह सैनी 17 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे. तर अनिल विज, कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. भाजपने मार्च 2024 मध्ये हरियाणा पक्षाच्या अध्यक्षपदावरून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले होते.
भाजपची सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक
नायब सिंग सैनी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी राजधानीत केंद्रीय मंत्री आणि हरियाणा भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली. हरियाणामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली आहे. सलग तीन वेळा राज्यात एका पक्षाने सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने हरियाणाच्या 90 विधानसभा जागांचे निकाल जाहीर केले आहेत. यात भाजपने 48 जागा जिंकत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळवले. तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या.
हेही वाचा:
गोपीनाथ मुंडेंचे फोटो हाती घेत समर्थकांची पकंजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला तुफान गर्दी





