ओझर : एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यानी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे ,केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्नर येथे केली
जुन्नर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील हे बोलत होते. प्रसंगी उमेदवार सत्यशिल शेरकर, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, अनंतराव चौगुले, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, तालुकाध्यक्ष तुषार थोरात ,मोहन बांगर, मंगेश काकडे, बाजीराव ढोले, अंकुश आमले, मोहित ढमाले, सईद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकार हे महाराष्ट्राला दुजेपणाची वागणुक देत असुन भाजप सरकारच्या काळात शेतक-यांवर नेहमीच अन्याय झाला आहे. ज्यांना आमदार केले, जि.प.अध्यक्ष केले ते पवार साहेबांना सोडून गेले तरी डगमगले नाहीत. देशात चुकीची राजनीति व आर्थिक नीती सुरू आहे. जीएसटी वाढविल्याने जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर तालुक्यात निवडणूक लढवता येत नाही. सद्यस्थितीत पवार साहेबांचा आशीर्वाद सत्यशील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करून आता खा. डॉ.अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर अशी जोडी शरद पवार यांनी दिली आहे असे वक्तव्य करून त्यांनी विरोधी उमेदवार पक्षाच्या उमेदवाराला जयंत पाटील यांनी टोला मारला .
लोकसभेला कोल्हे यांना ५१ हजार मतांचे लीड तालुक्याने दिले आहे. तालुक्यात पाच धरणांची निर्मिती केल्याने तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांसाठी महालक्ष्मी योजना मधुन तीन हजार रुपये देणार, महिलांसाठी मोफत प्रवास, शेतकऱ्यांची कर्ज माफी देणार व युवकांना बेरोजगार भत्ता ४ हजार, जाती निहाय गणना करून नुसार ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण वाढविण्याचा प्रयत्न राहील.
उमेदवार सत्यशिल शेरकर म्हणाले की , विघ्नहर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेरकर परीवार हे तालुक्यात समाजसेवा करण्याचे काम करत असल्याने शेतक-यांशी नाळ जोडलेली आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे.तालुक्यात पाणी टंचाई ,कांदा बाजारभाव या साठी वेळोवेळी आंदोलने केली आहे .दुष्काळी परिस्थित चारा व वाडी वस्तीवर पाणी पोहचविण्याचे काम केले असुन तालुक्याचा विकास केवळ शरद पवार यांच्या मुळेच झाला आहे.
माऊली खंडागळे म्हणाले की, शरद पवार व उध्दव ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडणा-यांना घरी बसवण्याची वेळ आली असुन कै.निवृत्तीशेठ शेरकर यांनी गावोगावी सायकल वरून जाऊन सभासद गोळा करून कारखाना उभारला आहे. तसेच शिवसैनिक नेहमी आदेश पाळतो गद्दारी कधीच करत नाही. आदेश पाळणार असुन भाजपाने अतीशय गलिच्छ राजकारण केले आहे. राज्य वाचवायचा असेल महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी यावेळी केले.