Mallikarjun Kharge – केंद्र सरकारने महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करून संसदेतील जागा वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सरकारचा हा प्रयत्न म्हणजे निवडणूक आचारसंहितेचे सरळ-सरळ उल्लंघन असून, याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी दिला. काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केवळ राजकीय लाभासाठी १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावू पाहत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. Narendra Modi: पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका सुरू असताना घाईघाईने घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करणे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही, असे ते म्हणाले. या प्रस्तावामुळे देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर खोलवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे यावर सखोल चर्चेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सरकार लोकसभेतील जागांची संख्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे. या मतदारसंघ पुनरचप्रक्रियेमुळे भविष्यात मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते, अशी भीती खर्गे यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करून एकजूट निर्माण करणार असून, या मनमानी निर्णयाविरोधात एकत्रित लढा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असतानाही निवडणूक आयोग गप्प असल्याबद्दल खर्गे यांनी खेद व्यक्त केला. सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे गृह मंत्रालयाचे उप-कार्यालय असल्यासारखे काम करत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र लिहून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली होती, परंतु सरकारने ती फेटाळून लावत आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी बैठकीत केला. महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस कटिबद्ध : या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध असून, सरकारचे हे पाऊल केवळ श्रेयाचे राजकारण करण्यासाठी उचलले गेल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम आशियातील संघर्ष आणि देशांतर्गत राजकीय परिस्थितीवरही या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.