Mary Millben : अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांचा कॉकरोच जनता पार्टीवर गंभीर आरोप; म्हणाले…
अमेरिकेची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेन (Mary Millben) ही भारताच्या राजकारणाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Mary Millben : अमेरिकेची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेन (Mary Millben) ही भारताच्या राजकारणाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने भारतीय तरुणांना कथित कॉकरोच जनता पार्टीविरुद्ध शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे.
या संघटनेला अमेरिकेतील अशा दात्यांकडून आर्थिक मदत मिळत आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात आहेत, असा गंभीर आरोप मिलबेन (Mary Millben) यांनी केला आहे. तथापि, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. बुधवारी दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान मिलबेन यांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका मांडली.
मेरी मिलबेन यांनी दावा केला की, अभिजित दिपके आणि त्यांच्या संघटनेला अमेरिकेतील अशा लोकांकडून आर्थिक पाठबळ मिळत आहे, जे पंतप्रधान मोदींच्या राजकीय विचारसरणीच्या विरोधात आहेत. भारताच्या राजकीय स्थैर्य आणि विकासात बाधा आणणाऱ्या अशा हालचालींविरुद्ध देशातील तरुणांनी गप्प बसू नये. या संदेशात मिलबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा खुलेआम पाठीराखा केला.
तरुणांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत आणि १२ वर्षांपासून देशाचे नेतृत्व करत आहेत. सलग तीन वेळा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणारे नेते कधीही बाह्य दबावापुढे झुकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
अमेरिकन दात्यांवर गंभीर आरोप
मिलबेन (Mary Millben) यांनी असाही आरोप केला की, काही अमेरिकन दाते जगातील विविध देशांमधील पुराणमतवादी (कंझर्व्हेटिव्ह) विचारसरणीच्या नेत्यांना लक्ष्य करतात. अशा देशांमधील ज्या व्यक्तींनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे, अशा लोकांना हे दाते हेरतात आणि त्यांना आपल्या देशात परत पाठवून राजकीय हालचालींसाठी फंडिंग करतात, असा दावा त्यांनी केला. मात्र, आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही सार्वजनिक पुरावा दिलेला नाही. त्यामुळे या कथित आर्थिक संबंधांना सध्यातरी मिलबेन यांचे आरोप म्हणून पाहिले जात आहे.
कोण आहे मेरी मिलबेन?
मेरी मिलबेन (Mary Millben) या अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री आहेत. भारतात त्यांना विशेषतः राष्ट्रगीत जन गण मन आणि ओम जय जगदीश हरे’ या भक्तीगीताच्या सादरीकरणामुळे मोठी ओळख मिळाली आहे. २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रगान गायले होते. आपल्या गायकीमुळे आणि भारताशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्या भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.






