Mallikarjun Kharge : ‘संसदेचे कामकाज आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर आक्षेप’; मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे कामकाज आणि आगामी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Mallikarjun Kharge – काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे कामकाज आणि आगामी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संसदेचे मान्सून सत्र संपल्यानंतरही सत्रावसान करण्यात झालेल्या अभूतपूर्व विलंबावर खर्गे यांनी बोट ठेवले असून या विषयावर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात खर्गे यांनी नमूद केले की, संसदेचे मान्सून सत्र १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते.
या घटनेला तब्बल ६४ दिवस उलटून गेले आहेत, तरीही अद्याप संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिकृत सत्रावसान करण्यात आलेले नाही. ही विलंब प्रक्रिया अत्यंत असामान्य आणि अभूतपूर्व असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मतदारसंघांच्या नव्या पुनर्रचनेबाबत इशारा देताना काँग्रेस अध्यक्षांनी स्पष्ट केले की, संसदेत पुनर्रचनेच्या प्रस्तावांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांशी सखोल चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे.
या संवेदनशील विषयावर विरोधकांना सविस्तर चर्चा करायची असून सरकारने कोणताही प्रस्ताव घाईघाईत आणू नये, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोणतेही घटनादुरुस्ती विधेयक संसदेत बळजबरीने किंवा दबावाने मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा खर्गे यांनी पंतप्रधानांना दिला आहे.
गेल्या निवडणुकांदरम्यानही विरोधी पक्षांनी असा आरोप केला होता की, भाजप दोन-तृतीयंश बहुमत मिळवून संविधानात बदल करू इच्छित आहे. मात्र, मोदी सरकारने यावर स्पष्टीकरण देत संविधानात बदल करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे आणि कोणालाही तशी परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.





