पुणे जिल्हा | आंबेगाव विधानसभा निवडणूक लढणार नाही- उद्योजक रमेश येवले यांची घोषणा

मंचर, (प्रतिनिधी) – कार्यकर्त्यांचा लढण्याचा आग्रह असून मतदाराही साथ देत आहेत. विजयासाठी लढायचे, पराभवासाठी नाही. मात्र, आता विजय दृष्टीक्षेपात नव्हता. बेरजेची समीकरणे जुळत नसल्याने आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा उद्योजक रमेश येवले यांनी रविवार, दि.२७ रोजी पत्रकार परिषदेत केली आहे.
एकलहरे (ता.आंबेगाव) येथे पत्रकार परिषद घेऊन उद्योजक रमेश येवले यांनी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करून धक्का दिला आहे. माघारीची भूमिका स्पष्ट करताना येवले म्हणाले,
कार्यकर्त्यांनी लढण्याचा आग्रह केला असला तरी बेरजेची समीकरणे जुळत नव्हती. मतदार पाठीशी असून त्यांच्यात रोष आहे. मात्र, तो कॅच करण्यासाठी व त्याचे परिवर्तन मतदानामध्ये करण्यासाठी कार्यकर्ते कमी पडत होते.
त्यामुळे विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेतला आहे. तालुक्यातील सुडबुद्धीचे राजकारण पाहता निवडणुकीत माझा पराभव झाला असता तर त्याचा त्रास कार्यकर्त्यांना झाला असता. हे होऊ नये यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. चारित्र्यवान माणसाबरोबर आम्ही राहणार आहोत, त्यासाठी पंधरा तारखेला होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्ते निर्णय घेतील.
उमेदवारीसाठी मी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्या पक्षाचा प्राथमिक सदस्य झालो होतो. मात्र, मी आताच या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन केला, त्याच्या आदल्या दिवशीच विधानसभा निवडणूक लढाईची नसल्याचे ठरले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.





