पुणे जिल्हा | डिंभे धरण, माणिक डोह बोगद्याचा प्रश्न निकाली

मंचर, (प्रतिनिधी) – हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा कालवा दुप्पट क्षमतेने वाहणार आहे. त्यामुळे डिंभे धरणातील माणिकडोह बोगदा करण्याची गरज राहिली नसून हा बोगदा शासन आदेशानुसार रद्द झाला आहे.
शासन आदेशाची प्रत पत्रकार परिषदेत दाखवून विरोधकांच्या आरोपांची महाविकास आघाडीचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी हवा काढून घेतली.
मंचर (ता.आंबेगाव) येथे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपाचे पक्ष निरीक्षक अतुल ब्रह्मभट, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा,
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील,भाजपाचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, तालुकाप्रमुख संदीप बाणखेले,शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात माणिकडोह बोगद्याचा प्रश्न विरोधकांनी ऐरणीवर आणल्याने त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील म्हणाले, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील ६५ कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा समावेश कुकडी प्रकल्पात करण्यात आल्याने आता पाण्याची अडचण येणार नाही.
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः आचारसंहिता लागण्यापूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या.
त्यामध्ये विविध मागण्या सादर केल्या होत्या. त्यानुसार जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील ६५ कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश झाला आहे. या बंधार्यामध्ये पाणी सोडण्याची हमी मिळाली आहे. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यास अडचण राहणार नाही. उपलब्धतेप्रमाणे दोन, तीन, चार वेळा बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडता येणार आहे.
त्यासाठी २.५५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात येणार आहे. तसेच कळीचा मुद्दा असलेल्या डिंभे धरणाच्या तळाशी केल्या जाणाऱ्या बोगद्यासंदर्भात अंतिम निर्णय आला आहे. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावा कालवा दुरुस्त केल्यानंतर बोगद्याची गरज राहणार नाही असे नमूद केल्याने हा बोगदा रद्द झाल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कालवा दुरुस्तीसाठी १०० कोटींचा निधी
कालवा दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. डावा कालवा दुरुस्त केल्यानंतर तो पूर्ण क्षमतेने चालणार आहे.सातगाव पठारसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कळमोडी योजनेवर बारीक लक्ष असून त्यासाठी सतत प्रयत्न करतो आहे.
पश्चिम आदिवासी पट्ट्यातील बोरघर, फुलवडे पाणी योजनेला तत्वता मान्यता मिळाली आहे. तसेच कळमजाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेचे काम सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील १२ गावांचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी सर्वे करण्याचे आदेश दिले आहे. तसेच त्यासाठी खर्च कुठून द्यायचा आहे. याचाही आदेश देण्यात आलेला आहे. डिंभे धरणातील बोगद्याचा प्रश्न निकाली निघाल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.





