पुणे जिल्हा : आंबेगाव विधानसभा मतदार संघात शिष्यांवर गुरुच ठरला भारी

– महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये झाली काटे की टक्कर
मंचर – यंदाची आंबेगाव विधानसभा निवडणूक खूपच अटीतटीची झाली. पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पहावयास मिळाली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वार्डनुसार जसे चित्र असते तसे चित्र विधानसभा निवडणुकीत पाहावयास मिळाले. मात्र, या लढतीत शेवटी गुरुने शिष्याला आसमान दाखवत लढाई जिंकली.
आंबेगाव विधानसभा निवडणुकीत मतमोजणी प्रक्रिया शनिवार, दि. २३ रोजी संपन्न झाली. २० फेऱ्यांच्या मतमोजणीत आदिवासी भागातून मतमोजणी सुरुवात झाली. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी आघाडी घेतली, तशी महायुतीच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली. मात्र, त्यानंतर वळसे पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली.
प्रत्येक वार्डात वळसे पाटील यांना मिळणाऱ्या मतांच्या तोडीस तोड मते समोरील महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनाही मिळत होती. दोन्ही उमेदवारांमध्ये कधी ५००, कधी हजार, दोन हजार, असे मताधिक्याचे साम्य होते. ते साम्य १७,१८ व्या फेरीपर्यंत राहिले. १९ व्या फेरीमध्ये वळसे पाटील यांना साडेचारशेची आघाडी राहिली.
आता शेवटच्या फेरीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, वळसे पाटील यांना शेवटच्या फेरीत आघाडी मिळाली व ते विजयी झाले. मात्र, पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शेवटी दिलीप वळसे पाटील यांचे शिष्य असलेले देवदत्त निकम यांना गुरुनेच आसमान दाखवत चितपट केले व निवडणुकीचे मैदान जिंकले.
आंबेगावात नेहमी होते इतिहासाची पुनरावृत्ती
आंबेगावच्या राजकारणात आतापर्यंत अनेकदा दिलीप वळसे पाटील यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे शिष्य, कार्यकर्ते हेच त्यांच्या विरोधात अनेकदा निवडणुकीत उभे राहिल्याचा तालुक्याचा इतिहास आहे. यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांचे सहकारी म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील,अरुण गिरे, शिवसेनेत असणारे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आणि पुन्हा शिवसेनेत गेलेले राजाराम बाणखेले व आताच्या लढाईत भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम या सर्व शिष्यांवर आतापर्यंत गुरु दिलीप वळसे पाटील हे भारी ठरले आहेत.
वळसे पाटील यांच्याबरोबर काम केलेले अरुण गिरे, राजाराम बाणखेले, कल्पनाताई आढळराव यांनीही यापूर्वी वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, त्यांनाही वळसे पाटील यांनी आसमान दाखवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांना ही वळसे पाटील यांनी चितपट केले. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात आजपर्यंत गुरु-शिष्यावर भारी ठरल्याची चर्चा होत आहे.





