पुणे जिल्हा | रोख रक्कम किंवा भेटवस्तू देणाऱ्यांवर भरारी पथकाची करडी नजर

अवसरी, (वार्ताहर) – वाहनांची तपासणी करताना पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम, दहा हजारांवरील किमतीची भेटवस्तू राजकीस कार्यकर्ता किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीजवळ आढळल्यास त्या वस्तू जप्त करून कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचा इशारा आंबेगावचे उपसंचालक तथा नोडल अधिकारी संदीप ओव्हाळ यांनी दिला.
घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे तहसील कार्यालयात आंबेगाव १९६ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथकांची मीटिंग पार पडली असल्याची माहिती खर्च व्यवस्थापन खेड, जुन्नर, नोडल अधिकारी संदीप ओव्हाळ यांनी दिली.
१९६- आंबेगाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, विडिओ पाहणी पथक, विडिओ सर्वेक्षण पथक व खर्च ताळमेळ समिती याची बैठक पार पडली.
या वेळी सहायक नोडल अधिकारी उपसंचालक शेती महामंडळचे संदीप ओव्हाळ, लेखाधिकारी महेश वाकचौरे, विभागीय आयुक्त राजेंद्र पाटणकर, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी विविध पथकातील अधिकारी उपस्थित होते.
स्टॅटिक सर्विलन्स टिम पथकाने वाहनांचे चेकिंग करताना जर ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम व १० हजारांवरील दारू, भेटवस्तू, अमली पदार्थ, पोस्टर्स, निवडणूक साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने उमेदवार किंवा प्रतिनिधी, कार्यकतें सापडल्यास सदर साहित्य जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या काळात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास आयकर विभागाला कळविले जाईल. एकूण ९ स्टॅटिक सर्विलन्स टिम तालुक्यात तीन ठिकाणी म्हणजे कळंब बायपास, घोडेगाव जुन्नर फाटा व टाकळी हाजी येथे तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहतील. नऊ फ्लाइंग स्काॅड टिम, तीन व्हिडीओ सर्विलन्स टिम, तीन व्हिडीओ वीव्हिंग टिम कार्यरत राहतील.अशी माहिती या वेळी देण्यात आली.


