मंचर, (प्रतिनिधी) – मंचर परिसरातील फासेपारधी वस्तीवर जाऊन तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनील भेके यांनी दिली. आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय नागटिळक, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील शहरी भाग, दुर्गम आदिवासी भाग, वाडी वस्तीवर विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत मंचर येथील फासेपारधी समाजाच्या वस्तीवर जाऊन तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे.त्यामुळे आंबेगाव विधानसभा स्वीप पथकाच्या वतीने तालुक्यातील कमी मतदान झालेल्या फासेपारधी वस्तीवर जाऊन मतदार बंधू-भगिनींना येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित मतदारांना मतदान संकल्प शपथ देण्यात आली. मतदार जनजागृती पथकाच्या आवाहनाला फासेपारधी मतदार बंधू-भगिनींच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आम्ही मतदान करणारच, असा विश्वास व संकल्प त्यांच्या वतीने केला जात आहे. एकलहरे परिसरातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली व त्यांनाही २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदार जनजागृती पथकाचे नोडल अधिकारी सुनील भेके सदस्य विनायक राऊत, सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे,तुषार शिंदे,राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे,मंगेश जावळे,अशोक लोखंडे उपस्थित होते. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करण्यास मदत करावी. – सुनील भेके, स्वीप नोडल अधिकारी,आंबेगाव विधानसभा.