पुणे जिल्हा | आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज

घोडेगाव, (वार्ताहर) – १९६ आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे बोलत होते. यावेळी गोविंद शिंदे यांनी १९६ आंबेगाव विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
निवडणुकीबाबत सूचना मंगळवार, दि.२२ रोजी देण्यात येणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवार, दि.२९ असणार आहे. अर्जाची छाननी बुधवार, दि.३० रोजी होणार असून सोमवार, दि.४ पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे.
बुधवार, दि. २० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी शनिवार, दि.२३ रोजी होणार आहे. उमेदवाराने अर्ज भरणे, तो स्वीकारणे, अर्जाची छाननी करणे, चिन्ह वाटप करणे ही सर्व प्रक्रिया घोडेगाव तहसील कार्यालय येथे पार पडणार आहे.
सध्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ०९ हजार २०६ नोंदणीकृत मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ४९४, महिला मतदार १ लाख ५१ हजार ७०३ असून इतर मतदार ९ आहेत.
निवडणुकीचा अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत मतदान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याने या मतदारांमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे.
आंबेगाव तालुक्यात ६३१ सैनिक मतदार असून त्यांच्या ईटीपीबीएस प्रणाली द्वारे मतदानाची सुविधा देण्यात आली असून निवडणूक कालावधीत निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना घरातूनच मतदान करण्याची सोय करण्यात येणार आहे.१९६ विधानसभा मतदारसंघात एकूण शहरी १५ व ग्रामीण ३२६ अशी एकूण ३४१ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रियेसाठी लागणारे ४१० मतदान यंत्र अवसरी खुर्द येथे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार असून या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
दोनहजारपेक्षा जास्त कर्मचारी तैनात
मतदान प्रक्रियेसाठी एकूण २०५० मतदान अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. यासाठी २३ पथके तयार करण्यात आली आहे.
त्यात १६० निवडणूक अधिकारी -कर्मचारी हे मतदारसंघाच्या विविध कामकाजामध्ये समन्वय ठेवण्याचे काम करणार आहे. निवडणूक काळात नेमण्यात आलेली पथके निवडणुकीस उभे राहिलेले उमेदवार यांच्या खर्चावर लक्ष ठेवणार आहे. तसेच कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये. याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.


