Ambegaon News: ‘त्या’ जीर्ण पुलावरून अवजड वाहतूक सुरूच; प्रशासन दुर्घटनेची वाट पाहतंय का?
Ambegaon News: नवीन पुलासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष बांधकामाला मुहूर्त मिळेना; मीना नदीला पूर आल्यास गावांचा संपर्क तुटण्याची ग्रामस्थांना भीती.

Ambegaon News – आंबेगाव तालुक्यातील वळती-शिंगवे मार्गावरील वळती गावाजवळ मांगीरबाबा मंदिराशेजारील ओढ्यावरील पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशानंतरही या पुलावरून दुचाकी,
चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने मीना नदीला पूर आल्यानंतर तो अनेकदा पाण्याखाली जातो. परिणामी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या पुलाच्या तळभागातील काँक्रीट अनेक ठिकाणी निखळले असून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत.
या सळ्यांना गंज लागल्यामुळे पुलाची मजबुती कमी झाली असून कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत वळती ग्रामपंचायतीने 3 ऑगस्ट 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीत हा पूल पूर्णपणे जीर्ण व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. आजही या पुलावरून दुचाकी, चारचाकी तसेच काही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, या ठिकाणी नवीन पुलासाठी निधी मंजूर झाला असला तरी अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही.





