Indrayani River Bridge : अवजड वाहनांची ओव्हरलोड वाहतूक नडली? कान्हे टाकवे पुलाच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप
Indrayani River Bridge : पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास गंभीर अपघातांची शक्यता; रात्रीच्या वेळी अचानक ब्रेक मारताना वाहनांच्या धडका.

Indrayani River Bridge – पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील इंद्रायणी नदीवरील कान्हे टाकवे पुलाची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पुलावरील रस्त्याची अवस्था खालावत चालली आहे. अनेक ठिकाणी काँक्रीट उखडले असून काही भागात लोखंडी जाळीही उघडी पडू लागली आहे. पुलावरील खड्डे रात्रीच्या वेळी सहज लक्षात येत नसल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास त्यांची खोली ओळखणे कठीण होणार असून गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी टाकवे बुद्रुक येथे सुरू असलेल्या खडी क्रशरविरोधात ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
त्यावेळी क्रशर, खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे गावातील सिमेंट रस्त्यांना भेगा पडल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. खड्ड्यांची संख्या आणि आकार वाढत गेल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पावसाळा तोंडावर असताना संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





