Indapur News: इंदापूरकरांसाठी खूशखबर! शहराच्या विकासासाठी २.७४ कोटींचा निधी मंजूर; पाहा काय बदल घडणार?
Indapur News: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; महतीनगर येथे १ कोटींमधून अत्याधुनिक 'नमो उद्यान' १० महिन्यांत साकारणार.

Indapur News – इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत राज्य शासनाच्या माध्यमातून स्मशानभूमी सुधारणा व पाण्याची टाकी ते राऊत सिटी या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७४ लाख रुपये, तर महतीनगर येथे अत्याधुनिक ‘नमो उद्यान’ उभारणीसाठी १ कोटी रुपये असा एकूण २ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वातून हा निधी उपलब्ध झाला असून, या विकासकामांचा शुभारंभ नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ३१) मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषदेतील गटनेते शकील सय्यद, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे,
मुख्याधिकारी रमेश ढगे, बांधकाम विभागाचे अभियंता शिवदत्त भोसले, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक शुभम पवार, अक्षय सूर्यवंशी, उमेश मखरे, भारत शिंदे, अतुल शेटे, गणेश राऊत, वाशिम बागवान, सुधाकर ढगे, अनिकेत वाघ, मुन्ना बागवान, प्रशांत उंबरे, निखिल महाजन, नागनाथ शिंदे, सत्यवान खुळे, वीरेंद्र दोशी उपस्थित होते.
“कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध नगरविकास योजनांच्या माध्यमातून इंदापूर शहराला सातत्याने भरीव निधी उपलब्ध होत आहे. ‘नमो उद्यान’ हा प्रकल्प इंदापूरच्या सौंदर्यात भर घालणारा आणि प्रत्येक कुटुंबासाठी विरंगुळ्याचे आधुनिक केंद्र ठरणार आहे. शासनाच्या विकासाभिमुख धोरणामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळत असून,आगामी काळातही अधिकाधिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– भरत शहा, नगराध्यक्ष.
दहा महिन्यांत साकारणार ‘नमो उद्यान’
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी सांगितले, “नगरविकास विभागाच्या मंजूर आराखड्यानुसार माहिती नगरी येथे उभारण्यात येणारे ‘नमो उद्यान’ अवघ्या दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उद्यानामध्ये सुस्थित हरित बगीचा, लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी, स्वतंत्र योगा ग्राउंड, पादचारी मार्ग, आकर्षक प्रकाशयोजना आणि नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणवत्तापूर्ण काम, वेळेत पूर्णत्व आणि शासनाच्या सर्व तांत्रिक निकषांचे पालन करून हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.






