Bhor News: आंबवडे खोऱ्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप
Bhor News: सततच्या मुसळधार पावसामुळे डांबरीकरण पूर्णपणे उखडले; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचा आरोप.

Bhor News – भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील आंबेघर, आंबवडे व कोरले या मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सततच्या पावसामुळे डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या मुख्य मार्गावरील टीटेघर, कोरले, चिखलगाव, वडतुंबी तसेच ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. दुर्गम भागातील या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरून वाहने जाताना खड्ड्यातील चिखल व दुर्गंधीयुक्त पाणी अंगावर उडत असल्याने अनेकदा वाहनचालकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. प्रशासनाने तातडीने हे खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी
भोरच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यात पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची तीन स्थळे आहेत. ऐतिहासिक रायरेश्वर किल्ला, आंबवडे येथील झुलता पूल आणि कारी येथील कान्होजी जेधे यांच्याशी संबंधित ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येथे येतात. मात्र, रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, परिसरात येणाऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे.





