Ambegaon News: “आमचे पुन्हा माळीण होऊ देऊ नका!” काळवाडीतील ग्रामस्थांची प्रशासनाला आर्त हाक
Ambegaon News: भीमाशंकर अन् पाटण खोऱ्यात धुवांधार पाऊस; जांभोरी ग्रामपंचायत हद्दीतील काळवाडी क्र. १ व २ मधील ग्रामस्थ भीतीच्या छायेत.

– रमेश जाधव
Ambegaon News – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जांभोरी ग्रामपंचायत हद्दीतील काळवाडी क्रमांक १ व काळवाडी क्रमांक २ येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. गावाच्या वर दरड कोसळण्याच्या स्थितीत असलेला डोंगर, खालच्या बाजूला डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली मोठी भेग,
अशा तिहेरी संकटामुळे ग्रामस्थांनी ‘आमचे पुन्हा माळीण होऊ देऊ नका; तातडीने पुनर्वसन करा,’ अशी आर्त मागणी प्रशासनाकडे केली आहे. गुरुवारपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढल्याने डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे. अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून काही घरांमध्ये पाणी झिरपल्याने कुटुंबीयांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पावसाळ्यात महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पाहणी करून आश्वासने देतात. मात्र, पावसाळा संपल्यानंतर पुनर्वसनाचा विषय पुन्हा थंडावतो. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातात; मात्र भरलेले घर, जनावरे आणि संसार सोडून अचानक कुठे जायचे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
उन्हाळ्यातच कायमस्वरूपी पुनर्वसन झाले असते, तर आज जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली नसती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ३० जुलै २०१४ रोजी माळीण येथे भीषण दरड दुर्घटना घडल्यानंतर राज्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी काळवाडी क्रमांक १ आणि २च्या पुनर्वसनाचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. मात्र, १२ वर्षे उलटूनही या गावांचे पुनर्वसन रखडल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.
“प्रत्येक पावसाळ्यात घरात पाणी झिरपते, भिंतींना भेगा पडतात. अधिकारी येऊन पाहणी करतात; पण त्यानंतर काहीच होत नाही. मागील वर्षी मोठमोठे दगड वस्तीपर्यंत आले होते. पुढील पावसाळ्यापूर्वी घरे देण्याचे आश्वासन मिळाले; पण काहीच झाले नाही. प्रशासन लोकप्रतिनिधी किती दिवस फसवणार ? ”
– चिमाजी पारधी व विठ्ठल पारधी, ग्रामस्थ, काळवाडी
“प्रत्येक पावसाळ्यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी धोकादायक गावांची पाहणी करून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देतात. “आम्हाला सुरक्षित घर हवे आहे. प्रत्येक रात्री मुलांना घेऊन भीतीत जागून काढावी लागते. आमचे पुन्हा माळीण होण्याची वाट पाहू नका. सरकारने तातडीने पुनर्वसन करावे, अशी आमची मागणी आहे.”
– नामदेव भोकटे, ग्रामस्थ






