Ambegaon Crime: आंबेगाव तालुक्यात संतापजनक प्रकार! शेतजमिनीच्या वादातून सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग?
Ambegaon Crime: विठ्ठलवाडी (लोणी) येथील ३५ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Ambegaon Crime- आंबेगाव तालुक्यातील रानमळा परिसरात शेतजमिनीच्या वादातून सुनेसोबत झटापट करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच तिच्या पतीला दगड उचलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सासऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
याबाबत ३५ वर्षीय महिलेने पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित महिला विठ्ठलवाडी, लोणी (ता.आंबेगाव) येथे पती, दोन मुले आणि सासूसह राहते.ती आणि तिचे पती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.महिलेचे सासरे हे अनेक वर्षांपासून दुसरे लग्न करून वेगळे राहत असून, शेतजमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित महिला आणि तिचे पती सविंदणे येथील शेतात कांदे भरण्याचे काम करत होते.तेथील काम संपल्यानंतर कामासाठी वापरलेले टोपले त्याच ठिकाणी राहिले होते.त्यामुळे गुरुवार, दि.१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हे दाम्पत्य टोपले आणण्यासाठी मोटारसायकल वरून सविंदणेकडे जात होते. दरम्यान, रानमळा येथील हाडवळा परिसरातील सरकारी विहिरीजवळ आले असता,
समोरून आलेल्या सासऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल दाम्पत्याच्या गाडीसमोर आडवी लावून त्यांना थांबविल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेने सासऱ्यांना काय झाले, अशी विचारणा केली असता, त्यांनी तिच्याशी वाद घातला. पतीसोबत असलेल्या भांडणात तिने मध्ये पडू नये, असे सांगत तिच्याशी झटापट केली आणि अंगावरील ब्लाउज फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल,
असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.यावेळी पत्नीची सोडवणूक करण्यासाठी पती मध्ये आला असता, सासऱ्यांनी जमिनीवर पडलेला दगड हातात उचलून त्याच्या अंगावर धाव घेतली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर दाम्पत्याने मोटारसायकल सुरू करून तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी सासऱ्यांनी त्यांच्या मागून मोठमोठ्याने आवाज देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पारगाव पोलीस करत आहेत.






