Income Tax Scam : पुण्यात ४,४२७ कोटींचा कथित आयकर घोटाळा; 2 सीएवर गुन्हा
Income Tax Scam : शेल कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात पैसा पाठविल्याचा आरोप; बनावट १५सीबी, १५सीए प्रमाणपत्रांचा वापर

पुणे : शेल कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात तब्बल ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये पाठवून केंद्र सरकारचा आयकर चुकविल्याचा आरोप दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर करण्यात आला आहे.
यासाठी बनावट कागदपत्रे, ऑडिट अहवाल तसेच फॉर्म १५सीबी आणि १५सीए तयार करून त्यांचा वापर केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी दोन सीएंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत हा कथित गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (३४), रा. आचलनगर, कोंढवा आणि मोहित शिवकुमार तोडी (३३), रा. कोंढवा बुद्रुक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत निगडी प्राधिकरण येथील तन्मयी सुहास देसाई (३१) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), २३४, २२९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बगरेचा आणि तोडी यांनी त्यांच्या एम.एस. ओडी अँड असोसिएट्स या फर्मच्या माध्यमातून अन्य साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
शेल कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर न करता अथवा त्यांची योग्य तपासणी न करता परदेशात पैसे पाठविण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म १५सीबीचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून आयकर विभागासमोर सादर केल्याचा आरोप आहे.
तसेच, फॉर्म १५सीए तयार करण्याचा अधिकार नसतानाही आरोपींनी तो तयार करून आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप आहे.
सन २०२२ ते २०२६ या कालावधीत संबंधित तीन कंपन्यांच्या माध्यमातून एकूण ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठविण्यात आले आणि या रकमेवरील कर चुकविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून परदेशात पाठविण्यात आलेल्या रकमेचा मूळ स्रोत, संबंधित बँक खाती, पैसा कोणत्या देशात पाठविण्यात आला तसेच तीन कंपन्यांच्या संचालकांची भूमिका याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा:
Ayushmann and Sharvari Wagh : आयुष्मान आणि शर्वरी वाघची जोडी एकत्र; खास लुकने वेधलं लक्ष





